Saturday, July 9, 2016

पारीजात

बेबंद उपमर्द, खेद, क्षोभ, अन् त्यातून आपात .
बेछूट खुज्या झावळ्या अन् झळांचे रोजचेच आघात
बेलगाम मनाचं बेनं ठेवतोय अविचल व अनघ्रात
बनवून खत आघातांचं, रुजवण्या उन्मुक्त पारीजात

(अनघ्रात = शुद्ध, नैसर्गिक, Pristine.)
(C) प्रशांत पेडणेकर , २९ एप्रिल २०१६.

पल

सहमा सहमा के शमाको देखते है |
हर ईक जलती उतरती मोम की बुंदे |
किस्सा ए जिंदगी बयान करती है |
खामोश करके ख्वाबोंकी तबीर भरी निंंदे |

 प्रशांत पेडणेकर , ३० एप्रिल  २०१६
काहीलीच्या उन्हात , अचानक अंधारलं
वारं सुसाटलं , आसमंत कडाडलं.
पण थेंबथेंब बरसलं,अन् सारच बदललं
गढूळ मळभ पळालं ,अन सार सारं साफ झालं.
झ्याक आन मस्ताड टेकाड पुन्हा दिसाय लागलं.

आजच्या पावसानंतरचे वातावरण , धुळीचा निचरा झाल्याने ईतके  स्वच्छ झाले की लांबवरच्या डोंगररांगा दिसु लागल्या ...... निगडी प्राधिकरणातून दिसणारी मावळाची डोंगर रांग , पांढ-या ईमारतीमागे दिसणारा पवना धरणाजवळचा तिकोणा किल्ला ........

प्रवास

प्रवास

सरणाच्या वाटेवर जाताना मी
माझाच पसारा त्रयस्थपणे पाहीला.
सोयरे पाहात होते कौतुकाने
आणि वैरी कुत्सीताने
परक्यानी कुतहुलाने .

पण तेंव्हाच सरणावरच्या मला जाणवले
विश्वाच्या खिजगणतीतील तो पसारा
माझाच होता एक बुडबुडा....
माझ्यातल्या मी पणाचा .....

अन करताना विचार त्या
सरणावरच्या पुनरानलोकनाचा
पण नाही वाटला खेद अविचाराचा
वा विषाद निर्णयाचा

कारण तो बुडबुडा होताच जणू
उसळल्या उद्वेगांचा,
 उन्मुक्त विचारांचा
उनाडल्या उन्नत   उत्तुंग भावनांचा
अर्थ , मन व शरीरापल्याड
अस्पर्श आत्मिक आनंदाचा.

प्रशांत पेडणेकर.
जुन २०१६

Tuesday, December 22, 2015

आठवणींचा वाढदिवस

आठवणींचा वाढदिवस.
"देखो तुम भुल गयी ना । आजसे पाच महिने पहले मैने तुम्हे दिल कि बात बतायी थी । " अस म्हणून शँपेनने नायिकेच्या भेटीचे सेलेब्रेशन करणारा " दिल चाहता है " मधला सुबोध आठवतोय. टाईमटेबलसारखं चाकोरीबद्ध आयूष्य असलेला. स्वतःसाठी थोडा स्वप्नील , नॉस्टाल्जिक असणारा सुबोध, ईतरांना मात्र त्याच्या आठवणींच्या सेलेब्रेशन करण्याच्या सवयीमुळे तो स्वमग्नतेच्या पुढच्या पातळीवर किंवा वेगळा वेगळा आहे असं वाटतं.
पण अशा छेट्या छोट्या आठवणीबद्दलची प्रत्येकाला वाटणारी ओढ , नॉस्टाल्जिया खरच किती वेगळा आणि सुंदर अनूभव असतो. ते सोनेरी क्षण किंवा हलकेफुलके सुखदु:खाची उधळण वा आनंदाची पखरण अनेक सुखांपेक्षा अनमोल असते.
आणि तोच स्मरणरंजनाचा क्षण जर दुस-या कोणी दिला तर म्हणजे तुम्ही कोणाला विश केलं आणि समोरची व्यक्ती  म्हणाली  की " तुम्ही फोन केल्यामुळच कळलं कि आज माझा वाढदिवस आहे. "
किती आनंददायी क्षण असेल तो.
कारण , वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी हे सगळं आपण साजरे करतो तो दिवस  म्हणून नाही, तर ती आठवण साजरी करत असतो .या दिवशी आपण जन्माला आलो म्हणून त्या दिवसाची आठवण असते.

अशाचं आठवणींची पोतडी असते प्रत्येकाकडे. अगणित क्षणांचे जसा घराचा वाढदिवस, गाडीचा वाढदिवस, जाॅयनींग सेपरेशन , प्रवास , प्रमोशन तर कधी अपघात , दुरावा ,मृत्यू अशा आठवणी...
अगदी आवाज , वादळासह आठवणारी.
ग्रेस यांच्या या आठवणी सारखी.

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
ती गेली तेव्हां रिमझीम पाउस निनादत होता .

किंवा लतादिदींच्या आर्त आवाजात सांगणारी

वो भूली दास्ताँ, लो फिर याद आ गई
नजर के सामने, घटा सी छा गई
कहाँ से फिर चले आए, ये कुछ भटके हुए साए
ये कुछ भूले हुए नगमे, जो मेरे प्यार ने गाए
ये कुछ बिछडी हुई यादे, ये कुछ टूटे हुए सपने
पराये हो गए तो क्या, कभी ये भी तो थे अपने

या वर्षातही तुमच्या जुन्या नव्या आठवणी असतील. कडूगोड,  चांगल्यावाईट,  त्या सर्व आठवणी तुमच्या सोबत नव्या वर्षात राहोत. ज्या प्रमाणे सेलेब्रिटी स्वतःच्या आठवणीसाठी आर्काईव्हज मॅनेजमेंट करणारा व्यक्ती कामावर ठेवतो किंवा फेसबूकवर ज्या प्रमाणे you have memory on this day of. अशी आठवण जपतो तसेच  दुनियेतील कुठल्याही ईतर बाबींशी संबंधापेक्षा स्वतःच्या संवेदनांशी प्रामाणिक राहून या वर्षीच्या आठवणी जपूयात .
त्या सर्व पुढच्या आयूष्यातील प्रगल्भतेसाठी ,परिपुर्णतेसाठी, सकारात्मक बाबींसाठी अन् पुर्नस्मरणरंजनासाठी नक्कीच उपयोगी ठरतील.
(C) प्रशांत पेडणेकर. डिसेंबर २०१५

Friday, November 6, 2015

सचिन आणि ब्ल्यू ओशन स्ट्रटेजी

सचिन आणि ब्ल्यू ओशन स्ट्रटेजी.

सचिन तेंडुलकर व शेन वार्न हि जोडी अमेरीकेत जाउन तिथे सचिन ब्लास्टर्स व वार्न वारीयर्स या संघांतर्फे क्रिकेट खेळणार याचे आश्चर्य वाटले नाही, पण कुतहुल, उत्सूकता व बदलती व्यावसायिकता याची जाणिव जरुर झाली. खेळावरचं प्रेम, नव्या मार्केटची निर्मिती, आशियायी लोकाचा क्रिकेट वरचा पगडा व  पडद्यामागची गणित अशा अनेक गोष्टीचा कोलाहल मनात होउ लागला. हे घडत असताना नेमक काय होतय व काय होणार याचा पत्रकारितेचा व मॅनेजमेंटचा विद्यार्थी म्हणून मी गोषवारा घेण्याचा हा प्रयत्न केला आहे.

सर्वात पहिला भाग म्हणजे सचिन खेळण्याचा आश्चर्य न वाटण्याचा किंबहूना त्याच्या क्रिकेटच्या प्रेमाचा . सचिन म्हणजे क्रिकेट व क्रिकेट म्हणजे सचिन हि वस्तूस्थिती आहे. त्यामुळे सचिनने क्रिकेट संपल्यानंतर समालोचक, प्रशिक्षक किंवा स्तंभलेखकाची भुमिका करणे त्याच्या चाहत्यांना किंवा सचिनला स्वत:लाही आवडले नसते. त्याला मैदानापासून लांब रहाणे किती अवघड होते हे त्याच्या व्टिटवरूनच समजून येत होते .
ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप २०१५ नंतर ११ एप्रिलला आलेले सचिनचे व्टिट "गेस व्हाटस् " चे बॅटिंगचे हेल्मेट घालतानाचे व्टिट सातएक हजार लोकांनी रिव्टिट किंवा लाइक केले होते . लोक
तेव्हांपासून काहीतरी चांगले घडेल व सचिन मैदानात येईल अशी आशा मनात धरून होते.

सचिनवर जिवापाड प्रेम करणारे प्रेक्षक किंवा  "भाईसाब ! जबसे सचिनने क्रिकेट छोडा है तबसे हमने भी क्रिकेट फॉलो करना छोडा है " असे म्हणणारे प्रेक्षक किंवा सचिनच्या जंटलमन्स गेमच्या व्याख्येप्रमाणे पंचांच्या निर्णयाची वाट न पहाता पीच सोडण्याच्या सचिनच्या निर्णयावर फिदा होऊन स्वत: सर्व नियम पाळणारे प्रेक्षक अशा अनेक लोकांची सचिन व क्रिकेट या दोन्हीवर श्रद्धा होती
त्यामुळे त्याचे पुनरागमन होइल हे निश्चितच होते पण कधी , कोठे कसे हे प्रश्न अनुत्तरीत होते.

पण गॉड ऑफ क्रिकेट चे पुनरागमन त्याच्या साजेसे व क्रिकेटला संजीवनी देणारे , सर्वापेक्षा वेगळे असायला हवे हे नक्की....अगदी अरण्यात नवी राजधानी बांधणा-या गोष्टीतील राजा सारखे.
(एका राज्यात राजा होण्यासाठी एक अट होती की तीन वर्षाचे राजेपद भोगल्या नंतर राजाने अरण्यात रहायला जायला पाहिजे.एका हुशार युवकाने ही अट स्विकारली व राजा बनला .पण तीन वर्षात त्याने अरण्यात एक नगर वसवले व राजवाडाही बांधला. त्यामुळे त्याने कार्यकाल संपल्यानंतर अरण्यात जाण्याची अटही पाळली व पुढील आयुष्यासाठी नव्या नगराचा राजाही झाला.)

सचिन हा असाच राजा आहे, पण त्याची ब्रॅंड व्हल्यू रू ७५ कोटीची आहे व फोर्बज् च्या वेबसाइटनुसार त्याच्याकडे १८ दशलक्ष डॉलर्सची एडोंर्समेट आहे. दोन वर्षात त्याचे व्टिटरवरचे फॉलोअर ४० लाखावरून ८० लाखावर पोहाचले आहेत. अशा राजाच्या क्रिकेट प्रेमाचा आयसीसीने वापर केला नाहीतर नवल कसले?

आयसीसीने तो केलाच तेही ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी वापरून.
काही वर्षापुर्वी डब्ल्यू. चान किम व रेनी मॉर्बन यांनी लिहीलेले एक मॅनेजमेट पुस्तक लिहीलेले होते.
ते पुस्तक  मार्केटमधील रेड ओशन मधून ब्ल्यू ओशन मधे जाण्याचा सल्ला देते. रेड ओशन म्हणजे स्पर्धा, भाववाढ , एकसुरीपणा , साचलेपणा  यातुन व्यवसाय वृद्धीच्या कमी संधी निर्माण होणे. आयसीसीने आयपीएल व्टेंटीव्टेंटीच्या माध्यमातून आशियायी देशातून बराच पैसा निर्माण केला. पण सचिन नसलेल्या, फिक्सींगने गांजलेल्या व कमी होणारे संघ व प्रायोजक तसेच सततच्या क्रिकेटचे अजिर्ण झालेले प्रेक्षक ,फुटबॉल लीग , प्रो कब्बडी यामुळे हे मार्केट रेड मार्केट सारखे झाले होते.
व नवतेला (Innovation ) मर्यादा आल्या आहेत. आता नविन काही करणे हे जिकीरीचे झाले आहे. अगदी 'हसी तो फसी' चित्रपटातील नायक प्रायोजकाकडून पैसै मिळवण्यासाठी क्रिकेटच्या  फिरत्या पिचची कल्पना देतो तसे.
पण ब्ल्यू ओशन स्ट्रेटेजी नव्या माहीत नसलेल्या मार्केटमधे जाण्यास सांगते. सद्ध्याच्या ग्राहकांमधे नाव कमवण्यासाठी (eliminate, reduce , raise & create) या चतु:सुत्रीचाल वापर करून व्हल्यू इनोव्हेशन केल्या नंतर ते नव्याने मार्केट च्या सीमा ठरवण्यास सांगते. त्या सीमा ठरवताना तीन प्रकारच्या ग्राहकांचा शोध घ्यावा लागतो.
१. तुमचे सध्याचे सोडून चाललेले ग्राहक
२ तुमचे उत्पादन कधीच न घेणारे ग्राहक
३. सीमेबाहेरील कधीही न आजमावलेले ग्राहक

आशियायी व कॉमनवेल्थ देश म्हणजे पहीला ग्राहक गट .ईंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी आणलेल्या अनेक गोष्टीबरोबरची एक गोष्ट म्हणजे क्रिकेटचा खेळ. एतत्देशीय सर्व रांगड्या व कुशलतेच्या खेळांना बाजूला सारून क्रमांक एकचे पद कधी घेतले ते कळालेच नाही. भारत पाकिस्तान , बांग्लादेश आस्ट्रेलिया विंडीज अशा कॉमनवेल्थ देशात  थोडक्यात द ग्रेट ब्रिटन च्या राणीला मानना-या देशात तो रुजला आहे व  
तीथे तो व्हल्यू इनोव्हेशन करून चालला आहे.

दुसरा ग्राहक गट उत्तर व दक्षिन अमेरीकी देशांचा. तसे पाहीले तर अमेरीकेत १७व्या शतकापासून क्रिकेट आहे पण सॉकर, बेसबॉल तसेच इतर खेळांमुळे तो कधी हवा तसा बहरला नसावा. किंबहूना बरेच लोक म्हणतात अमेरीकेच्या भारतापेक्षा जास्त प्रगतीचे कारण की ते भारतीयांसारखे आठआठ तास क्रिकेट पहाण्यात वाया घालवत नाहीत. पण आता क्रिकेटचे स्वरूप बदलेले आहे. कमी वेळ व अधीक वेळ असे स्वरूप आले आहे. तसेच आशियायी लोकांचे अमेरीकेतील प्रमाण साडेचार टक्क्यावर पोहोचले आहे.
बराक ओबामाचे व्टिटही बरेच काही सांगुन जाते (मला क्रिकेट मधील फार समजत व आवडत नाही पण मी  सचिन खेळत असला की अमेरीकेचा उत्पादनाचा रेट ५ टक्कयाने कमी का होतो.हे समजण्यासाठी मी सचिनचा खेळ पहातो.). अशा अमेरीकेच्या ग्राहकांना क्रिकेटचे उत्पादन विकण्यासाठी सचिनसह सर्व जुन्या खेळाडूंची पुण्याई व पत पणाला लागली आहे व त्या पुण्याईवर तीथे हा खेळ बहरेल हे नक्कीच.
जरी आयसीसीने युएसए क्रिकेट असोसीएशनचा व आयसीसी चा याच्याशी काही संबंध नाही असे सांगीतले असले तरी कार्यक्रमाचा हेतू क्रिकेटचा प्रसार करणे आहे हाच आहे.

तिसरा ग्राहक गट चीन व रशियाच्या ग्राहक बाजार पेठेचा आहे. लवकरच यासंबंधी आपणास काहीतरी ऐकायला मिळेल. व ब्ल्यू ओशन स्ट्रेटेजीचा नवा वापर कळेल.

सचिन ब्लास्टर्स व वार्न वारीयर्स यांच्या जंटलमेन्स गेमला शुभेच्छा. वैशिष्ट्य म्हणजे यात भारतीय, पाकिस्तानी ,श्रीलंकन ,ऑस्ट्रेलियन व विंडीज अशा ब्रिटीशांचा जुन्या वसाहतीतील खेळाडुचा जास्त समावेश आहे. खेळातील चांगुलपणा नष्ट न होता तो स्थलांतरीत , रूपांतरीत भावांतरीत व्हाव्यात अशी सद्धीच्छा.
(Good thinks shall never end ,it either transfer , transform or translate ).

प्रशांत पेडणेकर
७ नोव्हेंबर २०१५

Monday, October 26, 2015

वजन मापे अन परीमाण

बाई
तुमी लईच भारी शिकवायचा तवा.
सगळ गणित झ्याक वाटायच तवाच्याला
सगळी म्हणायची जिवन शिक्षण विद्यामंदीर मधलं शिकनं लई बेस्ट व्हणाराय आपल्याला.
बेस्ट म्हंजी सोविएटदेशच्या गुळगुळीत चित्रांगत.
लैबाई
तुमी लईच भारी शिकवायचा तवा.
सगळ गणित झ्याक वाटायच तवाच्याला
सगळी म्हणायची जिवन शिक्षण विद्यामंदीर मधलं शिकनं लई बेस्ट व्हणाराय आपल्याला.
बेस्ट म्हंजी सोविएटदेशच्या गुळगुळीत चित्रांगत.
पुस्तकांची लै भारी कवरं व्हणा-या त्या मासिकागत.

देवळात भरणा-या आपल्या शाळेत शिकलेली
वजन, मापे आन् परिमाणे ओळखाची वाटायची तवा.
हक्काच्या शिधापत्रीकेवरच्या  धा गोष्टींतल्या साखर , ज्वारी पामतेलावर दुकानदार मालक  गिचमिड वजन ल्यायचा
तो मंजी मोठा वजनदार  माणूस असायचा तवा.
मध्यरात्रीला स्वातंत्र्यावेळचा स्वप्नाचा हात मागं व्हता तवा
२ लिटर,५ लिटर मापाचा रॉकेलचा कावळा सायकलवरच्या टाकीसकट ओळखीचा वाटायचा तवा.
लिटरमागं ४रु जास्त दिले की पांढरं रॉकेल मिळायचं कार्डाशिवाय.
सार्वभौम समाजवाद तवाच शिकलो बाई.

© प्रशांत पेडणेकर , दसरा २०१५

पण बाई खरचं सांगतो ९० चं साल संपलं
पेपरमधी पेरेस्रोयका ग्लास्तनोस्त वाचलं
आपल्याकडं खाऊजाचं वादळ आलं
आणि वाटलं सगळचं गुळगुळीत झालयं
जीवन शिक्शण नकोसं झालयं
प्रीस्कुल ला डिग्रीचे मोल आलयं
ट्युशनला एसीचं फँड आलयं
निळं रॉकेलही दिसंनास झालयं

आता मी १० मिंटाचं पेट्रोल घालवुन रांगेत गाडी पार्क करतो. पार्कींगचे पैसे भरतो व मॉलमधे जातो.
शिधापत्रीकेवरच्या १० जीवनावश्यक गोष्टी आता पावलीच्या असतात.
अन् बाकिचे बाराआणे जातात, गुळगुळीत वस्तुवर
डियो,शॉम्पू,कपडे पावडर, रूमफ्रेशनरच्या वासावर
२०० वाहिन्यातील जाहीरीतीनी सांगितलेल्या नव्या गरजावर.
रिबिनवर लिहीलेल्या वस्तूंसाठी स्वाईप करतो टेचानं.
अँडम स्मिथचा अदृश्य हात असतो माझ्या अन् बील बनवणा-या कंत्राटी कामगाराच्या हातामागे .
आता नविन परिमाणे शिकतो मी क्रिसील रेटींग , सेंन्सेक्स व टिआरपीची .
गुळगुळीत स्क्रिनवर ब्राउज करतोय आणि टॅक्स वाचवता वाचवता सबसिडी सोडायच ठरवतोय.

पण बाई थोडाफार चुकेन ,भुलेन गुळगुळीतपणाला तरीपण "उतनार नाही मातनार नाही" अशातही !सामाजिक , आर्थिक व राजनैतिक न्यायाचं संविधान अंगिकृत करेन
कारण विसरलो नाही!
तुम्ही दिलेलं जीवनशिक्षण योग्यअयोग्य, सत्यअसत्याच्या मापाच.

© प्रशांत पेडणेकर , दसरा २०१५