Tuesday, May 19, 2015

Prajakt

आजोबांच्या घरी परसात छोटेसे मारूतीचे मंदीर व त्याला लागूनच प्राजक्त. 
प्राजक्ताची फुलांची तिन्हीसांजेलाच उमलायला सुरवात व्हायची. टवटवीत शुभ्र पाकळ्या अन् केशरी दांडा पाहून कायम पाहून लगेचच तोडून तळहातावर घ्यावीशी वाटायची.

पण घरचे संस्कार रात्री झाडाला,पानाफुलांना हात न लावण्याचे.
मग काय रात्री हूरहूर व्हायची सकाळी उठायची आणि पुजेसाठी मनसोक्त फुले तोडण्याची. 

अंघोळ करायची व देवाजवळची पितळेची परडी उचलायची अन लागायचे फुलं तोडायच्या कामाला. राजस्थानी पद्धतीच्या हत्तीच्या अबांरीसारखी बैठक असणारी ती हाताएवढी परडी. दोन पेर उंचीपर्यंत त्यात फुल भरायची. फुलांबरोबर प्राजक्ताच्या हिरव्याजर्द पावलीच्याएवढ्या बिया असायच्या. दिवसभर पैसा म्हणून खेळण्यासाठी त्या वापरायच्या.
कितीही अलगद फुल तोडली तरी बोटांना फुलांच्या दांड्याचा केशरी रंग लागायचा.
पण परडीत फुलांचा गालीचा तयार झालेला असायचा.
पण एक विचार डोक्यात रहायचा की कालचा सांजेचा टवटवीतपणा आता कमी का ?.
तसाच विचार करत परडी देवाजवळ आजोबांना द्यायची .त्यांच्या शेजारी बसून पुजा पाहायची.
तो शाळीग्राम , गणपती ,टाक आणि बाकीचे दहाएक देव. ते सगळे देव ताम्हणात गेल्यावर देवाह्र्यात उरायची कालची वाळलेली काळपट केशरी प्राजक्ताची फुलं...निर्माल्य अस नव नाव मिळालेली......आजोबांच्या तूंगराज जरंडेश्वर अशा देवाच्या नावाच्या गजरात आणि धीरगंभीर रामनामातदेखील मनात प्राजक्ताची फुलच भरून रहायची वेगवेगळ्या रूपात.....
कालांतराने आजोबाही गेले अन् प्राजक्ताच झाडही...प्राजक्ताची फुलं मात्र राहीली मनात . सगळ्या आठवणी द्यायला..... सगळ्याच संवेदनातून सुखद दुःखद...
आजही सुखद प्रसंग सकाळचा ताज्या फुलासारखे असताना मनात उद्याच्या निर्माल्याची वेदना येते व मनात कल्लोळ होतो....पण सांजवेळच्या प्राजक्त समजावतो की या पलीकडे विचार कर " हे ही दिवस जातील" या सार्वत्रिक उक्तीचा...आणि सावरवतो...
त्याचा शुभ्र व केशरी रंग हेच तर सांगत नसेल ना की मी प्रतिक आहे वैभवाचा अन् वैराग्याचा...
प्रशांत.

No comments:

Post a Comment