मन के मते न चलिये, मन के मते अनेक
आपल्या मेंदूत सतत वाहणाऱ्या विचारांचा एक गोंधळाचा मेळावा चाललेला असतो. अर्धवट कामे , राजकारण, खेळ एखादी जाहीरात , आपण कोणाला वाईट बोलल्यावर त्याची आठवण, भविष्यात काय होईल याची काळजी व खेद, भूतकाळातल्या घटना आणि त्यांचं विश्लेषण, इतरांनी बोलण्यामुळे नकोसे वाटणे, अपयशाची भीती, तुलना, अपेक्षा, आणि स्वतःबद्दलचे शंका. अशा अनेक विचारांनी मन एखाद्या गर्दीच्या बाजारासारखं होतं — प्रत्येक दुकानातून (विचारातून) आवाज येतो, कोणी ओढतं, कोणी बोलावतं. परिणाम काय? मनात सतत गोंगाट चालू असतो, आणि लक्ष केंद्रित करणं किंवा योग्य निर्णय घेणं अवघड होतं.
गोंधळलेलं मन सतत ‘करायचं आहे, बघायचं आहे, आठवायचं आहे’ अशा यादीत अडकून राहतं. ही मानसिक गर्दी तणाव, बेचैनी, आणि थकवा निर्माण करते. यात आपण वर्तमान क्षणाचा आनंद हरवतो, कारण आपलं लक्ष भूतकाळाच्या धुक्यात किंवा भविष्याच्या धावपळीत अडकलेलं असतं.
याच्या उलट सजगता (Mindfulness) ही जणू या बाजारात शांतपणे एका कोपऱ्यात बसून, फक्त जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना (विचारांना) बघणं आहे — त्यात अडकून न पडता, फक्त निरीक्षण करणं. यामुळे मन मोकळं होतं, विचार स्वच्छ होतात, आणि आपण हलके, प्रसन्न वाटतो.
कबीर जी म्हणतात जो स्वतःच्या मनावर राज्य करतो त्यासारख्या बलवान कोणी नाही.
वीस मिनिटाचे एक मेडिटेशन आहे त्यातील संगीताच्या लयीनुसार श्वासावर नियंत्रण ठेवलं तर रोज थोड्या प्रमाणात सजगतेकडे (mindfulness) वाटचाल होउ शकते.
No comments:
Post a Comment